PMPML

संस्थेबद्दल

introduction
about us

संस्थेबद्दल :

पुणे शहर हे भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी एक शहर म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी व विद्येचे माहेरघर असा समृद्ध वारसा या शहराला लाभला आहे. पीएमपीएमएल या शहरातील सक्षम सार्वजनीक वाहतूक व्यवस्था असून चौका-चौकातून आधुनिकतेच्या व्दारातून प्रवास करणारी संस्था आहे. पुणे शहर हे शहर शिक्षण, नोकरी, उद्योजक या सर्वांचे आधुनिक उत्कृष्ठ मध्यवर्ती केंद्र बनले आहे. येथे दररोज देशातील सर्व भागातून मोठया प्रमाणात रोजगारासाठी, शिक्षणासाठी, पर्यटनासाठी नागरीक येत असतात. या येणाऱ्या नागरिकांना/प्रवाशांना सक्षम सार्वजनिक वाहतूक सेवा पुरविण्याची महत्वाची भुमिका बजावत आहे. ही सेवा बजावताना तंत्रज्ञानातील सर्व प्रणालींचा सर्वोत्तम वापर करून प्रवाशांना कमीत कमी बस भाडे आकारून सुरक्षीत व शास्वत सेवा पीएमपीएमएल पुरवित आहे. पुणे शहराच्या जलद गतीने होणाऱ्या विकासामध्ये पीएमपीएमएल चा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. पुणे शहर, पुणे शहरा लगतचे औद्योगिक नगरी म्हणून नावाजलेले पिंपरी चिंचवड शहर या दोन्ही शहरालगत असणाऱ्या वीस किलोमीटर हद्दीपर्यंतच्या नागरी व ग्रामीण भागामध्ये पीएमपीएमएल वाहतुक सेवा कार्यक्षमपणे पुरवीत आहे.

पुणे शहर सार्वजनीक वाहतुक सेवासंबंधी इतिहास

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुक सेवा प्रणाली हळूहळू विकसित झाली आहे. १९४० च्या सुरुवातीस शहरातील सार्वजनीक वाहतूकीकरीता घोडागाडी (टांगा) हे एकमेव प्रवासी वाहतुकीचे साधन होते. त्यावेळी पुणे नगरपालिकेने सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्याची कल्पना मांडली. त्यावेळी आरटीओने मे. सिल्व्हर ज्युबली मोटर्स या कंपनीला ज्यावेळी चार मार्गांकरीता २० बसेसचे वाहतूक परवाना दिला त्यावेळी या कल्पनेस प्रत्येक्ष मुहुर्त स्वरूप प्राप्त झाले. हळूहळू १९४८ पर्यंत बसेसची संख्या जलद गतीन ४६ पर्यंत वाढली.

पुणे महानगर पालिका परिवहन उपक्रमाची स्थापना

पुणे नगरपालिकेचे १९५० मध्ये पुणे महानगर पालिकेमध्ये रूपांतर झाल्यानंतर मुंबई प्रांतीक मनपा अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार पुणे महानगरपालिकेने स्वत:ची सार्वजनीक प्रवासी वाहतुक प्रणाली सुरू करण्याच्या हेतूने मे. सिल्व्हर ज्युबिली मोटर्स या कंपनीकडून शहर प्रवासी वाहतूक सेवा स्वत:च्या ताब्यात घेतली. १९६० मध्ये एकूण १४ मार्गांवर ५७ बसेस धावत होत्या. तदनंतर ही संख्या टप्प्या टप्प्याने वाढत गेली.

पिंपरी-चिंचवड महानगर परिवहन उपक्रमाची स्थापना

पिंपरी-चिंचवड महानगर परिवहन उपक्रमाची स्थापना दि. ४ मार्च १९७४ रोजी फक्त ८ बसेसवर पिंपरी गाव ते भोसरी या एकमेव मार्गावर सुरू करून करण्यात आली. त्यावेळी फक्त पिंपरी येथे एकच बस डेपो होता. १९८८ मध्ये गव्हाणे वस्ती भोसरी येथे दुसरा डेपो निर्माण करण्यात आला व तोच डेपो नंतर धावडे वस्ती भोसरी येथे स्थलांतरीत करण्यात आला. त्यावेळी या उपक्रमाकडे १३ मार्गांवर ४५ शेड्यूल चालवण्याकरीता १०१ बसेसचा ताफा होता.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. स्थापना

पुणे शहर व लगतचे पिंपरी-चिंचवड शहर या दोन्ही शहरातील नागरिकांना सक्षम व अधिक चांगली वाहतुक सेवा देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने पुणे महानगर पालिका परिवहन उपक्रम व पिंपरी चिंचवड महानगर परिवहन उपक्रम या दोन्ही उपक्रमांचे एकत्रीकरण करून पुणे महानगर परिवहन महामंडळ लि. या कंपनीची स्थापना १९५६ च्या कंपनी कायद्यानुसार केली. परिवहन महामंडळास एकत्रीत सार्वजनीक प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यास १९ ऑक्टोबर २००७ रोजी मान्यता मिळाली. तेव्हापासून पीएमपीएमएल ही संस्था वाजवी दरात सुरक्षित सेवा देणारी संस्था नावारूपास आली.

संस्थेची रचना: डाउनलोड करा